
तुळजापूर : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (दि. ७ नोव्हेंबर) तुळजापूर येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आंदोलनातून शेतकऱ्यांनी सरकारविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
तुम्ही करा दिवाळी, आम्ही करू शिमगा चारा छावणीला चारा नको, शेतकऱ्याच्या दावणीला चारा द्या अशा घोषणांनी आंदोलनस्थळ दणाणून गेले. बैलगाड्या, बैल आणि खर्डा-भाकरी यांसह आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी ग्रामीण जीवनातील वास्तव आणि शेतीसमोरील संकटे प्रभावीपणे मांडली.
ऊस उत्पादकांना प्रतिटन पाच हजार रुपये पहिली उचल मिळावी, या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या एकूण १२ मागण्यांसाठी संघटनेने आंदोलनाची हाक दिली होती. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पीकविमा, कर्जवसुली आणि शेतीसाठी लागणाऱ्या साधनसामग्रीचा खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, आटलेल्या विहिरींमधील गाळ काढण्यासाठी आर्थिक सहाय्य, रोजगार हमी योजनेतून स्वतःच्या शेतात कामाची संधी, उसाला प्रतिटन पाच हजार रुपये एमएसपी व पहिली उचल, शंभर टक्के पीकविमा भरपाई, २०२५ च्या पीकविमा योजनेतून वगळलेल्या शेतकऱ्यांना विमा रक्कम, बंद रेशनकार्ड पुन्हा सुरू करणे, बँका व मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जवसुली थांबविणे, ट्रॅक्टर व शेती यंत्रसामग्रीच्या कर्जहप्त्यांना स्थगिती तसेच शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरला मोफत डिझेल देणे, अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
विशेषतः जनावरांसाठी चारा छावण्या उभारण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या दावणीला थेट चारा उपलब्ध करून द्यावा, ही मागणी आंदोलनाच्या केंद्रस्थानी होती. शेतकऱ्यांना केवळ आश्वासन नको, तर प्रत्यक्ष मदत हवी अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रवींद्र इंगळे, धनाजी पेंदे, तानाजी पाटील, विष्णुदास काळे, दुर्वास भोजने, प्रवीण कदम, अमोल कुतवळ, सचिन कदम, रामेश्वर नेटके, शहाजी सोमवंशी, कल्याण भोसले, ईश्वर गायकवाड, बापू धुमाळ, विजय सिरसाट यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या १२ मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. तुळजापुरातील या रास्ता रोको आंदोलनातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्यात आले.

Views: 35



